नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरात भूकंपाचे तब्बल ६४ सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यापासून १.६ ते ४.३ रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के नोंदवले गेले आहेत.
सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये या भूगर्भीय हालचाली जाणवल्या आहेत. शनिवारी रात्री ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्काही नोंदवण्यात आला.
गेल्या काही काळात या भागांमध्ये सौम्य स्वरूपाच्या भूगर्भीय हालचालींची नोंद झाली आहे. त्यामध्ये १.६ रिश्टर स्केलपासून ४.३ रिश्टर स्केलपर्यंतच्या धक्क्यांचा समावेश आहे.
तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालचा अतिरिक्त दाब कमी होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे हे सौम्य धक्के जाणवत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील भूगर्भीय हालचालींवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी नव्याने चार भूकंपमापन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींची सातत्याने नोंद आणि निरीक्षण केले जाणार आहे.
नाशिक शहराचा समावेश सिस्मिक झोन-३ मध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूगर्भीय हालचालींच्या नोंदी आणि त्यावरील निरीक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


