नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, पेठ आणि कळवण तालुक्यांमध्ये सलग जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणे, पूल, जलप्रकल्प, शासकीय इमारती आणि शाळांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
भूकंपाचा परिणाम लक्षात घेऊन विशेषतः भूकंपग्रस्त भागांतील शाळांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तपासणीदरम्यान कोणत्याही इमारतीत संरचनात्मक नुकसान आढळल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्व संबंधित विभागांनी आपला अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या माध्यमातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


