नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मार्ग सकाळी १० वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून सीसीटीव्ही यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे. यंदा प्रथमच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील गर्दी आणि हालचालींवर पोलिसांची अधिक बारकाईने नजर राहणार आहे.

दरम्यान, सीबीएस आणि पंचवटी परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच मुंबईनाका आणि द्वारका परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पेठ रोड आणि दिंडोरी मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरातील प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.