नाशिकच्या सातपूर परिसरातून चोरीला गेलेली तब्बल २० लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या प्रकरणाचा जलदगतीने तपास करत नाशिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. या प्रकरणी संशयित आरोपी समाधान शिरोळे याला अटक करण्यात आली आहे.

स्कॉर्पिओ चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेत संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्याची तयारी केली.

दरम्यान, संशयित नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित समाधान शिरोळे पोलिसांच्या जाळ्यात येताच त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर चोरीला गेलेली २० लाखांची स्कॉर्पिओही पोलिसांनी हस्तगत केली.

अवघ्या २४ तासांत चोरीचा तपास पूर्ण करून वाहन हस्तगत केल्याने गुन्हे शाखा युनिट दोनच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. वाहनचोरीच्या या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, तसेच चोरीची नेमकी पद्धत काय होती, याचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.