गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली असून नाशिकच्या रामकुंड परिसरातील दशक्रिया शेड पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. या घटनेमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
दशक्रिया शेड वाहून गेल्याने धार्मिक विधींसाठी येणाऱ्या कुटुंबीयांना पावसातच विधी पार पाडावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांनी महानगरपालिका आणि प्रशासनाकडे तातडीने पर्यायी शेड उभारण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांनाही त्रास होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


