नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उधमाळ गाव आता देशाच्या नकाशावर एका अनोख्या कारणामुळे झळकणार आहे. भारतातील पहिले 'डार्क स्काय समुदाय' गाव म्हणून उधमाळची निवड करण्यात आली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून ४२ लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत गावात प्रकाश प्रदूषण कमी करून रात्रीचे नैसर्गिक आकाश जतन करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. डार्क स्काय इंटरनॅशनल संस्थेच्या निकषांनुसार पर्यावरणपूरक प्रकाश व्यवस्था उभारली जाईल. अनावश्यक कृत्रिम प्रकाश कमी करून ताऱ्यांचे नैसर्गिक निरीक्षण शक्य होईल, अशी संकल्पना या प्रकल्पामागे आहे.

ग्रामसभेने पेसा कायद्यांतर्गत प्रकाश प्रदूषण नियंत्रण आणि अंधारमय आकाश संवर्धनाचा ठराव मंजूर केला आहे. ऊर्जा बचत करणारे दिवे, स्थानिक युवकांना प्रशिक्षण, तसेच खगोल निरीक्षणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख होईल, तर खगोल पर्यटनामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धन, विज्ञान शिक्षण आणि ग्रामीण पर्यटन यांचा संगम घडवणारा हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानला जात आहे.