नाशिक शहरात सिटीलिंक बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना पिंपळगाव बहुला परिसरात घडली. त्र्यंबकेश्वर ते पंचवटी असा प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने लांबविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी येथील तेजस्विनी पिंगळ या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर त्या सिटीलिंक बसने पंचवटीच्या दिशेने प्रवास करत होत्या. सातपूर-पिंपळगाव बहुला दरम्यान प्रवास सुरू असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित बस सातपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी बसमधील प्रवासी आणि बसची तपासणी केली. मात्र चोरीला गेलेले मंगळसूत्र सापडले नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


