नाशिक : नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. पत्नी आणि सात वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून पतीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

जेलरोड लगतच्या महारुद्र कॉलनीतील वसंत विहार येथे ही घटना घडली. या घटनेत अश्विनी हजारे आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा श्रेयश हजारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर किरण हजारे याने विषारी औषध सेवन केल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर आणि मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या दुहेरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या पोलीस विविध अंगांनी तपास करत असून हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.