मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या वेळी कॉम्बिंग आणि ऑलआउट ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली. रात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती.
या कारवाईत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 मोटारसायकली, 9 रिक्षा, 11 तलवारी आणि 9 सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 15 लाख 92 हजार 100 रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत 148 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासोबतच अवैध व्यवसायांवर छापे टाकण्यात आले. मोटारसायकल चोरी आणि गुटखा तस्करीप्रकरणीही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालेगाव शहरातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.


