नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत चोरीला गेलेले ११ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणात तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने कारवाई केली.

संभाजी चौक परिसरातील एका घरातून ११ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास सुरू केला.

पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अल्पावधीत संशयित महिलेचा शोध घेत कारवाई केली. या कारवाईत १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत असून, चोरीसंदर्भातील इतर बाबींचीही चौकशी सुरू आहे.