मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील आठवडे बाजारात भेळभत्ता खाल्ल्यानंतर नागरिकांना विषबाधेचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुरुवातीला १४० हून अधिक जण बाधित झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली आहे.

आठवडे बाजारात भेळभत्ता आणि चटणी खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना उलटी, जुलाब आणि मळमळ यासारखा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि बाधित नागरिकांना मालेगाव येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार, भेळभत्त्यासोबत देण्यात आलेल्या चटणीमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चटणीसह भेळभत्ता खाल्लेल्या नागरिकांनाच त्रास झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले असून, चटणीशिवाय भेळ खाल्लेल्या नागरिकांना असा त्रास झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बाधित रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या मालेगाव येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. एका बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, भेळभत्ता आणि चटणीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर गावात आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज