नाशिकच्या एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दत्तनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान संबंधित बालकांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली जप्त केल्या.
या कारवाईमुळे एमआयडीसी, गंगापूर, सातपूर, मोखाडा आणि दोंडाईचा परिसरातील एकूण ९ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळाली असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.


