नाशिक : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या 'नशामुक्त नाशिक' अभियानांतर्गत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पंचवटी परिसरात छापा टाकत पोलिसांनी तब्बल 51 किलो डोडा अर्थात अफूचा चुरा जप्त केला असून, या प्रकरणी राजस्थानातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पेठ रोडवरील दत्तनगर परिसरातील एका घरावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान विक्रीसाठी लपवून ठेवलेला तब्बल 51 किलो डोडा जप्त करण्यात आला.

 

पोलिसांनी अमली पदार्थांसह एकूण 8 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सुभाष मंगळाराम बिष्णोई (वय 42) असे असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे.

प्राथमिक तपासात आरोपी गेल्या दहा वर्षांपासून नाशिकमध्ये गॅस दुरुस्तीच्या व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.