बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात नव संघर्ष रिक्षा चालक-मालक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने १० ऑगस्ट रोजी नाशिक ते मंत्रालय धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, बाईक टॅक्सी सेवांमुळे रिक्षा चालकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होत असून अनेक चालकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या अशा सेवांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
रिक्षा चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनात राज्यभरातील रिक्षा चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नव संघर्ष रिक्षा चालक-मालक संघटनेने केले आहे. १० ऑगस्टच्या मोर्चाकडे आता रिक्षा चालकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.


