नाशिक शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत पंचवटी पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शोध पथकाने एका संशयिताला अटक केली असून, चौकशीत १३ घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एनआयटी महाविद्यालय परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. आरोपीकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान गुजरात आणि मध्य प्रदेशातील कथित साथीदारांची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासात पंचवटी, आडगाव, म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १३ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, घड्याळे, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ४३ हजार ४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर कथित साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


