नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत एकूण 79 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार सायंकाळच्या वेळेत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालये, मॉल आणि उद्यान परिसरात पोलिसांनी तपासणी करत संशयित हालचालींवर लक्ष ठेवले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे या मोहिमेत सहभाग घेतला.

या विशेष मोहिमेत 14 अधिकारी, 40 अंमलदार आणि आठ स्वतंत्र पथकांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.