नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पिळकोस फाट्याजवळ मॅक्झिमो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दिनेश गावित, पत्नी कीर्ती गावित आणि त्रिशा गावित गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही तातडीने उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर तिघांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला. त्रिशा गावित यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
माहितीनुसार, मृत पती-पत्नीचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कळवण पोलीस पुढील तपास करत आहेत.


