नाशिक जिल्ह्यातील दाढेगाव (लोणेवस्ती) परिसरात पाथर्डी–दाढेगाव पुलाशेजारील रस्ता मुसळधार पावसामुळे खचल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतात जाण्यासाठीचा हा एकमेव मार्ग बाधित झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
सततच्या पावसामुळे पुलाशेजारील रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या असून शेतीची कामे आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम होत आहे. परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर केला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतीचेही नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुलाची उंची वाढवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.


