दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ लासलगावात संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
हातात तिरंगा घेऊन आंदोलकांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला. लासलगाव बस डेपो येथून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय तसेच मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्याकडे निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.


