कळवण तालुक्यातील मानूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या शेतात तसेच रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मानूर शिवारातील लोकवस्ती आणि शेताजवळ बिबट्याचे दर्शन होत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्यामुळे पाळीव प्राण्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणखी वाढली आहे.
बिबट्याचा मुक्त वावर लक्षात घेता नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच वन विभागाने मानूर परिसरात गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
मानूर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


