बीड : बीड जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खामगाव-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा  उपस्थित होत आहे.

८७८ कोटींचा खर्च, तरी रस्त्यावर भेगा

अहमदपूर ते अहिल्यानगर हा सुमारे १७० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गासाठी तब्बल ८७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, एवढा खर्च करूनही मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.