देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस जवानांना चंद्रपुरात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. एकवीस ऑक्टोबर या पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारक मैदानावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी हुतात्म्यांच्या आठवणींनी कुटुंबीय भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

१९५९ मध्ये लडाखमधील भारत-चीन सीमेवरील हॉट स्प्रिंग्स परिसरात चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा भारतीय पोलीस जवान शहीद झाले होते. या जवानांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी देशभरात पोलीस स्मृतिदिन पाळला जातो.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस जवानांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण या दिवशी केले जाते.

 

चंद्रपुरातील या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वसुमना पंत, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.