गोंदिया : विदर्भातील सर्वात उंच रावण दहन सोहळा गोंदिया शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील टीबी टोली मैदानावर आयोजित या भव्य सोहळ्यात १०१ फुटांच्या रावणाचा आणि ९१ फुटांच्या मेघनादाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. या विशाल पुतळ्यांमुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
रावण दहन उत्सव समितीच्या वतीने यंदा सलग चौथ्यांदा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावण आणि मेघनाद यांचे विशाल पुतळे तयार करण्यासाठी छत्तीसगडमधील कुशल कारागिरांनी मेहनत घेतली होती. या पुतळ्यांच्या दहनाचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता होती.
या कार्यक्रमातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईतील कलाकारांनी सादर केलेला ‘कांतारा’चा देखावा. या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भव्य रावण दहनासोबतच हनुमान चालीसा पठण आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण सोहळ्याला भक्तिमय आणि उत्सवी वातावरण लाभले.
रावण दहन उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत नागरिकांना भव्य कार्यक्रमाचा अनुभव देण्यात आला. आयोजक उमंग शाहू यांच्या सहभागातून पार पडलेल्या या सोहळ्यात रावण आणि मेघनादाच्या विशाल पुतळ्यांसह ‘कांतारा’चा देखावा विशेष चर्चेचा विषय ठरला.


