नवी मुंबई महापालिका कामगारांच्या वाढीव वेतनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठराव होऊनही कामगारांना प्रस्तावित ७ हजार ५०० रुपयांची वेतनवाढ अद्याप मिळालेली नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात वाढीव वेतनाचा लाभ मिळत नसल्याने मनसेने प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. यावेळी मनसेकडून अनोख्या पद्धतीने ‘टोपी घालो’ आंदोलन करण्यात आलं.

कामगारांच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ठराव झाल्यानंतरही वेतनवाढ लागू न झाल्याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, येत्या आठ दिवसांत वेतनवाढीबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे कामगारांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे.