मनमाड  :  कर्जत-लोणावळा घाटात झालेल्या भीषण भूस्खलनानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांनी चार दिवस जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. मुसळधार पाऊस, चिखल आणि सतत कोसळणाऱ्या मलब्यातही त्यांनी कर्तव्य निभावत रेल्वे प्रशासनाचा भार हलका केला.

भूस्खलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर विविध मंडळांतील ट्रॅकमन कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. यामध्ये भुसावळ मंडळातील मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांनी चार दिवस जीवघेण्या परिस्थितीत रेल्वेमार्गावरील मलबा हटविण्याचे काम अखंड सुरू ठेवले.

घरापासून दूर राहून दिवस-रात्र केलेल्या त्यांच्या अथक परिश्रमामुळे रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून हजारो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

 

https://www.aplanashik24.tv/maharashtra/landslide-threat-in-ratnagiri-khed-cracks-in-ground-put-15-houses-at-risk

 

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या निवास व भोजनाची अडचण समोर येताच एनआरएमयूचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांनी तातडीने आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रिप्लेसमेंट व्यवस्था राबविण्याचे निर्देश दिले.

मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांची ही कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि समर्पण संपूर्ण रेल्वे प्रशासनासाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.