मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. भाजपचे गणेश धात्रक यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली असून, बाजार समितीवरील सत्ता भाजपकडे गेली आहे. या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

सभापतीपदासाठी गणेश धात्रक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवड प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मनमाड शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या निवडीमुळे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाला राजकीय धक्का मानला जात आहे. तसेच माजी आमदार संजय पवार यांनी पुन्हा धात्रक गटाला पाठिंबा दिल्याने बाजार समितीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याची चर्चा आहे.

निवड जाहीर होताच समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. या घडामोडींनंतर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तांतर आणि त्याचे स्थानिक राजकारणावर होणारे परिणाम याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.