नाशिक जिल्ह्यातील बोरगाव परिसरात आज सकाळी सलग चार भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांपासून धक्क्यांची मालिका सुरू झाली. काही नागरिकांनी धक्क्यांसोबत मोठे आवाजही ऐकू आल्याचे सांगितले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच संबंधित तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाच भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये आणखी चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.