नाशिक: नाशिकच्या आनंदवली परिसरातील नवश्या गणपती रोडवर रस्ता अचानक खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या सुमारे १० फूट खोल खड्ड्यात खडी घेऊन जाणारा डंपर अडकला.
डंपर अडकल्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत डंपर चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मात्र रस्ता अचानक खचल्याने डंपरचे मोठे नुकसान झाले असून, अडकलेला डंपर बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागणार आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली. विशेषतः वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे अचानक रस्ता खचल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रस्ता नेमका कशामुळे खचला, त्यामागे पावसाचे पाणी, पाइपलाइन लिकेज किंवा अन्य कारण आहे का, याची तातडीने पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.


