गोमाता संरक्षण आणि संवर्धनाच्या मागणीसाठी देशभर राबविण्यात आलेल्या 'गोमाता सन्मान अभियान' अंतर्गत नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. अभियानाअंतर्गत संकलित करण्यात आलेल्या सह्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना उद्देशून सादर करण्यात आले.

या अभियानाद्वारे देशभरातील नागरिकांच्या सह्या संकलित करण्यात आल्या. नाशिकमध्ये ६ लाख १२० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि गोमाता संरक्षण व संवर्धनासाठी शासनाने प्रभावी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी, अभियानाचे नाशिक संयोजक रमेश मानकर, महंत शिवानंद, महंत अनिकेत शास्त्री, तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, इस्कॉन आणि विविध धार्मिक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अभियानाच्या माध्यमातून गोसंरक्षणाबाबत जनजागृती करण्याबरोबरच शासनाने या विषयावर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी उपस्थितांनी केली. निवेदन स्वीकारल्यानंतर पुढील स्तरावर ते संबंधित संवैधानिक पदाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.