गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या फुलबाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गुरुपूजनासाठी लागणाऱ्या विविध फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुलाब, झेंडू, शेवंती, निशिगंधा, जर्बेरा आणि लिली या फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीचा परिणाम थेट फुलांच्या दरावर झाला असून अनेक प्रकारच्या फुलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

जानोरी परिसरातील गुलाबी गुलाबाचा दर २०० रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय झेंडू, निशिगंधा, शेवंती आणि जर्बेरा यांच्या दरातही वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कायम राहण्याची अपेक्षा असून, फुलांच्या किमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.