नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने धडक कारवाई केली आहे. चोपडा लॉन्सजवळ गोदावरीकिनारी उभारण्यात आलेलं अनधिकृत धार्मिक स्थळ महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हटवण्यात आलं.
नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने या बांधकामाची दखल घेत कारवाई केली. पहाटेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि कारवाईला सुरुवात केली.
महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं. गोदावरी नदीकाठच्या परिसरात अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.
नदीकाठचा परिसर आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची पाहणी करून नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


