नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका परिसरातील नंदिनी नदी पुलाची दुरवस्था समोर आली आहे. पुलावरील कठडा तुटल्याने तसेच मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावरील कठडा अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून लोखंडी संरक्षण पाईपही कोसळले आहेत. यामुळे विशेषतः पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

या पुलावरून दररोज हजारो वाहने नाशिकरोड, शिर्डी आणि पुण्याच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, धोकादायक स्थिती असूनही अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांनी यापूर्वीही या ठिकाणी अपघात झाल्याचा उल्लेख करत मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाचा कठडा आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.