आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या कॉलेज रोडवरील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. महापूजेनंतर विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावली.

दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेची विशेष तयारी केली होती. शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन प्रक्रिया पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिकमधील विठ्ठल मंदिरात दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण कायम असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.