नाशिकमध्ये रिंग रोडसाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून बाधित महिला शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी कुंभमेळा प्राधिकरणाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

रिंग रोडसाठी होणाऱ्या जमीन संपादनावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी प्राधिकरणाच्या दालनाबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी केली. बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढून न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनामुळे प्राधिकरण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून अद्याप तोडगा निघाला नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.