श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक शहरातील शिवमंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे.
नाशिकचे ग्रामदैवत मानले जाणाऱ्या कपालेश्वर मंदिरासह सोमेश्वर मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये विशेष धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिर परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची ये-जा आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी नाशिकमधील शिवमंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे आगामी श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवरही प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे.


