नाशिक :

नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून उंटवाडी पुलावरील वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे उंटवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल मार्गही तात्पुरता बंद करण्यात आला असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.