नाशिक : कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने मंगळवारी (दि. १३) शहरातील तब्बल ६१ ट्रॅफिक सिग्नलचा वीजपुरवठा अचानक खंडित केल्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पार बट्ट्याबोळ झाला. सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी (दि. १४) दिवसभर शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला होता.
नियमित वीजबिल भरूनही महावितरणने असा मनमानी कारभार का केला, असा संतप्त सवाल करत महापालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणला अधिकृत पत्र पाठवले. महापालिकेकडून सर्व ६१ ट्रॅफिक सिग्नलची ग्राहक क्रमांकासह यादीच पत्रासोबत जोडून महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. "मनपा नियमितपणे वीजबिल भरत असताना पूर्वसूचना न देता परस्पर वीजपुरवठा का कापला?" अशा आक्रमक शब्दांत पालिकेने महावितरणची कानउघाडणी केली.
महापालिकेच्या या कडक आणि आक्रमक पवित्र्यानंतर महावितरण लागलीच बॅकफूटवर आले. अखेर बुधवारी (दि. १४) सायंकाळी उशिरा महावितरणने शहरातील सर्व ६१ ट्रॅफिक सिग्नलचा वीजपुरवठा पूर्ववत केला. वीजपुरवठा सुरू झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी महावितरणच्या या अचानक आणि निष्काळजी कारवाईमुळे नागरिकांना मात्र दोन दिवस नाहक मनस्ताप सहन करावा लागला.


