जुन्या नाशिकच्या गावठाण परिसरातील अनेक वाडे अतिधोकादायक स्थितीत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम २६४, २६५ आणि २६६ अंतर्गत संबंधित मालक आणि भाडेकरूंना जाहीर तसेच वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटिसांमध्ये धोकादायक भाग हटवणे अथवा आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने नागरिक, मालक आणि भाडेकरूंना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दिलेल्या मुदतीत आवश्यक उपाययोजना न केल्यास संबंधित मालमत्तांवर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यासह कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधितांनी निर्धारित मुदतीत आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.