नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्याच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कुंभमेळ्याच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय उपक्रमांची माहिती देत राष्ट्रपतींना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.

 

या निमंत्रणादरम्यान ध्वजारोहण सोहळ्यासह गोदा आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावरील कॉफी टेबल बुक आणि विशेष टपाल तिकिटाच्या अनावरणासाठीही राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक वैभव देशासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निमंत्रण संचाचेही विशेष आकर्षण होते. 

 

कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शवणाऱ्या त्रिमितीय कलाकृतीचा या संचात समावेश होता. तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान करण्यात आला.

 

या भेटवस्तू संचामध्ये आदिवासी समाजाच्या शबरी नॅचरल्सची उत्पादने, येवला येथील प्रसिद्ध पैठणी, नाशिकच्या काळ्या मनुका, काजू, चिवडा, मिठाई आणि सुकामेवा यांचा समावेश होता. या माध्यमातून महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला आणि कृषिसमृद्धी अधोरेखित करण्यात आली.

या भेटीदरम्यान मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.