दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ, शृंगेरी येथील श्री जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामीजी लवकरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर संयुक्त तीर्थ पुरोहित संघाने शृंगेरी येथे जाऊन महास्वामीजींची भेट घेत त्यांना आगामी धार्मिक सोहळ्यांसाठी विशेष निमंत्रण दिले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर १ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे गंगा-गोदावरी पूजन आणि स्नानाचा पवित्र कार्यक्रम होणार आहे.

या दोन्ही धार्मिक सोहळ्यांसाठी शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामीजींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर संयुक्त तीर्थ पुरोहित संघाच्या शिष्टमंडळाने शृंगेरी येथे जाऊन ही भेट घेतली.

या भेटीदरम्यान पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त आणि सिंहस्थ समिती अध्यक्ष सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, धर्म निर्णय निर्देशक शांतारामशास्त्री भानोसे, घनपाठी वेदमूर्ती लोकेशशास्त्री अकोलकर, विलास अंबेकर, सरचिटणीस प्रतीक शुक्ल यांच्यासह प्रमोद दीक्षित, मंदार शिंगणे आणि सौरभ गायधनी उपस्थित होते.

‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः’ या भावनेतून कार्य करणाऱ्या पुरोहित संघाने सिंहस्थाच्या धार्मिक परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी हे निमंत्रण दिले आहे.

शंकराचार्यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला या दौऱ्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होणार आहे.