नाशिक : नाशिकच्या सिंहस्थ नगर परिसरातील भाद्रपद सेक्टरमध्ये ड्रेनेज तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली असून स्थानिकांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सततच्या पावसामुळे परिसरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ताच घाण पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना दररोज सांडपाण्यातूनच शाळेत जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांनी महापालिकेला तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून साचलेले घाण पाणी हटवावे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


