नाशिक : राज्यभरातील शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी मुख्याध्यापकांना 'स्विफ्टचॅट' (SwiftChat) ॲप डाउनलोड करून मोबाइल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागणार आहे.
त्यानंतर ॲपमधील 'स्मार्ट उपस्थिती' बॉट सुरू करून शाळेचा ११ अंकी 'युडायस कोड' (UDISE Code) आणि शिक्षकाचा 'शालार्थ आयडी' नोंदवून नोंदणी पूर्ण करावी लागेल. ज्या शिक्षकांचा शालार्थ आयडी उपलब्ध नाही, त्यांनी युडायस प्लस पोर्टलवरील राष्ट्रीय शिक्षक कोडचा वापर करावा. मात्र, हा कोड नोंदवताना त्यापूर्वी 'NTC' हा उपसर्ग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापकांना 'टेक टीचर अटेंडन्स' पर्यायाद्वारे शिक्षकांची दैनंदिन हजेरी नोंदवता येईल. यामध्ये शिक्षक उपस्थित, गैरहजर, अर्धी रजा, पूर्ण रजा की प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत, याची नोंद करता येईल. शिक्षकांची उपस्थिती शाळेच्या वेळेनुसार सकाळी ९ ते १२ किंवा १० ते ५ या वेळेत नोंदवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची उपस्थितीही ऑनलाइन
शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांची हजेरीही या प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. वर्गशिक्षकांना 'टेक स्टुडंट अटेंडन्स' पर्याय निवडून तुकडीनुसार गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करून उपस्थिती अहवाल तयार करता येईल.
दरम्यान, या ऑनलाइन उपस्थितीचा नियमित आढावा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक घेणार असून, सर्व शाळांवर शिक्षण विभागाचे थेट लक्ष असणार आहे.


