सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ११ वर्षीय जान्हवी सुखरूप कुटुंबीयांकडे

नाशिकमध्ये सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ११ वर्षीय जान्हवी सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांकडे परतली. त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन कोकणे कुटुंब सिटीलिंक बसने पंचवटीच्या दिशेने प्रवास करत होते. पंचवटी कारंजा येथे कुटुंबीय बसमधून उतरले; मात्र जान्हवी बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

कुटुंबीय बसमधून उतरून गेल्यानंतर काही वेळाने बसमध्ये जान्हवी एकटीच असल्याचे चालक आणि वाहकाच्या लक्षात आले. आई-वडील दिसत नसल्याने चिमुकली घाबरून रडत होती. परिस्थिती लक्षात घेत चालक लोहकरे आणि वाहक अर्चना आंधळे यांनी तिला धीर देत सुरक्षितपणे सिटीलिंकच्या कंट्रोल रूममध्ये आणले.

जान्हवी उपाशी असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला बिस्किटे देऊन तिची काळजी घेतली. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

अखेर कुटुंबीयांचा शोध लागल्यानंतर जान्हवीला तिच्या आई-वडिलांकडे सुरक्षितपणे सोपवण्यात आले. यावेळी आई आणि मुलीची झालेली भावनिक भेट उपस्थितांसाठी हृदयस्पर्शी ठरली.

या संपूर्ण प्रसंगात सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचे कौतुक होत आहे. एका चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज