नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बससेवेतील वाढत्या तक्रारींची महापौर हिमगौरी आडके यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच परिवहन समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिटी लिंक बससेवेत रॅश ड्रायव्हिंग, बस वेळापत्रकातील विस्कळीतपणा, अनधिकृत नियुक्त्या आणि कारभारातील त्रुटी याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने प्रशासनाला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बससेवेच्या कारभारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी परिवहन समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.


