नाशिकरोड बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामामुळे एसटी बससाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. मात्र, या तात्पुरत्या बसस्थानकाच्या जागेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केली जात असल्याने एसटी बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची समस्या समोर आली आहे.
तात्पुरत्या बसस्थानकासाठी उपलब्ध असलेल्या जागेत दुचाकी वाहने उभी राहत असल्याने बसला ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः बस येताना आणि प्रवाशांना घेऊन पुढील मार्गावर जाताना पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिकरोड बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत एसटी बसची वाहतूक या तात्पुरत्या ठिकाणाहून सुरू राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध ठेवणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
तात्पुरत्या बसस्थानकाच्या ठिकाणी अनधिकृत किंवा अडथळा निर्माण करणारे दुचाकी पार्किंग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बसची ये-जा सुरळीत व्हावी आणि प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी तात्पुरत्या बसस्थानकावर पोलीस हवालदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, बसस्थानकाचे काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि तात्पुरत्या बसथांब्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी संबंधित प्रशासनाकडून पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणाबाबत ठोस व्यवस्था केली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.


