नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मधील पोलीस वसाहत कॉलनीसमोरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

चिखल आणि पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तसेच या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता सुरक्षित करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.