नाशिकमधील सोमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था पावसामुळे अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात घसरून अपघात होण्याची शक्यताही वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली.

श्रावण महिना लवकरच सुरू होणार असल्याने सोमेश्वर मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, विकासकामे आवश्यक असली तरी ती योग्य नियोजन करून करावीत आणि पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केले आहे.