नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १५ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आमिष दाखवत मुंबईतील काही जणांकडून सुमारे १० लाख ९५ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात मंत्र-तंत्र, पूजा आणि चमत्काराच्या नावाखाली पीडितांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीला पैसे दुप्पट झाल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमेच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आश्वासन देण्यात आलं.

कथित चमत्कारानंतर पीडितांच्या हवाली नोटांनी भरलेली गोणी करण्यात आली. मात्र ती गोणी उघडल्यानंतर नोटांच्या बंडलमध्ये वरच्या बाजूला खरी नोट ठेवून आतमध्ये मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा असल्याचा प्रकार समोर आल्याने कथित भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला.

पीडितांनी पैसे परत मागितल्यानंतर पुन्हा पूजेच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पूजा करण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेत अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती असून, इतर आरोपींचा आणि या कथित फसवणुकीच्या जाळ्याचा पुढील तपास सुरू आहे.

१५ कोटींच्या पैशांच्या पावसाचं आमिष नेमकं कसं दाखवण्यात आलं? या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे? आणि अशाच प्रकारे इतरांचीही फसवणूक झाली आहे का? या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज