नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.३०) आणि शनिवारी (दि. ३१) आयोजित धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण व भव्य गोदाआरती सोहळ्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. रामकुंड व गोदाघाट परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी तपोवन मैदानातून निघणारी धर्मध्वज मिरवणूक तपोवन क्रॉसिंग, पंचमुखी हनुमान, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, फूलबाजार, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, रविवार कारंजा व होळकर पुलावरून मालेगाव स्टँडमार्गे रामकुंडावर पोहोचेल. या संपूर्ण मार्गावर तसेच अशोक स्तंभ ते रविवार कारंजा आणि रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट या जोडरस्त्यांवर प्रवेशबंदी असेल.
तसेच ३१ ऑक्टोबरला मुख्य ध्वजारोहण व गोदाआरती प्रसंगी रामकुंडाकडे जाणारे रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, सरदार चौक, शनी चौक व मखमलाबाद नाका परिसरातील रस्ते बंद राहतील. हे सर्व निर्बंध ३० ऑक्टोबरला सकाळी ६ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत आणि ३१ ऑक्टोबरला सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.
पार्किंग व पायी जाण्याचे मार्ग :
भाविकांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, बी. डी. भालेकर मैदान, संभाजी महाराज गार्डन आणि श्रद्धा लॉन्स येथे वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तेथून रामकुंडावर जाण्यासाठी स्वतंत्र पायी मार्ग निश्चित केले असून, या मार्गांवर 'नो पार्किंग' झोन लागू राहील. रुग्णवाहिका व अग्निशामक वाहनांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे.


