नाशिकमधील औरंगाबाद नाका ते द्वारका मार्गावर पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरला आहे. सकाळपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, वाहनांचे संतुलन बिघडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरल्याच्या घटना घडल्या आहेत.

माहितीनुसार, आतापर्यंत या मार्गावर सुमारे १० अपघात झाल्याची नोंद आहे. या अपघातांपैकी एका घटनेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे कठीण होत असून, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सकाळच्या कार्यालयीन गर्दीच्या वेळेत या परिस्थितीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

या मार्गावरील चिखल तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.